औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:38 PM2019-11-26T15:38:43+5:302019-11-26T19:05:18+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Maharashtra Government News: 'These' leaders hold short term chief ministership | औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

Next

महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला धक्का दिला आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान शक्य तितकं पुढे ढकलण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.

कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना संसदेत बहुमताची चाचणीत यश मिळावायचे होते. मात्र भाजपाला जादूई आकडा गाठता न आल्यामुळे अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या नावावर एक विक्रम झाला होता.

 सर्वात कमी कालावधीसाठी पुढील नेत्यांनी सांभाळले मुख्यमंत्रिपद-

1) जगदंबिका पाल -

उत्तर प्रदेशच्या जगदंबिका पाल यांच्या नावावर सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम आहे. २१ फेब्रुवारी १९९८ ला राज्यपाल भंडारी यांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त करून जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र पुढच्याच दिवशी राज्यपालांच्या निर्णलाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती दिली. विधानसभेत जगदंबिका पाल या बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत आणि त्यांना खूर्ची सोडावी लागली. त्यामुळे जगदंबिका पाल यांनीा केवळ एक दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सांभाळला.


2) बी.एस. येडियुरप्पा -

कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना फक्त अडीच दिवसानंतर राजीनामा द्यावा लागला होता. न्यायालयाने येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करण्यास अपयश आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

3) देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कालावधी 79 तास म्हणजेच साडे तीन दिवसांचा होता.

4) सतीश प्रसाद सिंह -

बिहारचे मुख्यमंत्री सतिश प्रसाद सिंह यांना अवघ्या पाच दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमाना होणारे सतिश प्रसाद सिंह हे पहिले मागासवर्गीय नेते होते.

5) एस.सी. मारक -

सर्वात कमी मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या यादीत मेघालयचे नेते एससी मारक यांचाही समावेश आहे. एससी मारक हे फक्त ६ दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी १९९८ ते ३ मार्च १९९८ पर्यंत मुख्यमंत्रीपदावर होते.

6) शिबू सोरेन -

झारखंडच्या राज्यपालांनी २ मार्च २००५ला शिबू सोरेन यांना अल्पमतात असतानाही सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. परंतु शिबू सोरेन बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठू न शकल्याने दहा दिवसानंतर म्हणजे १२ मार्च २००५ ला त्यांना राजीनामा द्याला लागला होता.


7) जानकी रामचंद्रन -

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ला निधन झाल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यावर निर्णय झाला नाही. पक्षातील आमदारांनी एकत्र येत राज्यापालांना मुख्यमंत्र्यांची पत्नी जानकी रामचंद्रन यांना पाठिंबा असल्याचे पत्र लिहिले. राज्यपाल एसएल खुराना यांनी ७ जानेवारीला जानकी रामचंद्रन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र विधानसभेत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने त्यांना अखेर 24 दिवसानंतर राजीनामा द्यावा लागला होता.

8) बी.पी. मंडल -

बिहारचे मुख्यमंत्री सतिश प्रसाद सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर बीपी मंडल यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. मात्र त्यांना 31 दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


9) सी.एच. मोहम्मद -

केरळचे मुख्यमंत्री सी.एच. मोहम्मद यांनाही फार काळ मुख्यमंत्रीपदी राहता आले नाही. मोहम्मद हे १२ ऑक्टोबर १९७९ ते १ डिसेंबर १९७९ असे फक्त ४५ दिवस मुख्यमंत्री होते.

Web Title: Maharashtra Government News: 'These' leaders hold short term chief ministership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.