नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना अद्याप सरकार स्थापन करता आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोघांचं घोडं असलं असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसिलही चर्चा सुरू नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. मात्र, आता पवारांनीच शिवसेनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलंय.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर, शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिकात्मक प्रतिसाद दिला. शिवसेनेसोबत सरकार बनवणार का याचं उत्तर शिवसेनेलाच विचार, असं म्हणत ते निघून गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, शरद पवारांनीच आता स्पष्टीकरण दिलंय.
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापनेवरुनचा गुंता पवारांनीच सोडवला म्हणता येईल. कारण, महाशिवआघाडीबाबतचं कोडं आता पवारांनीच उलगडलंय. 'शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल', असे शरद पवारांनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीच्या वेब आवृत्तीने यासंदर्भातील वृत्त दिलंय. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. त्याअगोदर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून, महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाची माहिती देणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आजही सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच, 1 डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच, शरद पवार-नरेंद्र मोदी भेट ही महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळ परिस्थितीवर असून त्याचा राजकीय अर्थ लावू नये, असेही राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर, पवारांनीच महाशिवआघाडीसंदर्भा बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलंय.