नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तर या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 'सत्य मेव जयते' असं ट्विट करून सत्याचाच विजय होत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 'आपली न्यायव्यवस्था ही पारदर्शक आणि तटस्थ आहे. सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं आहे. आमच्या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आम्ही सत्य बोलत होतो. देशामध्ये न्यायालयात सत्य पराभूत होऊ शकत नाही. आम्ही तयार आहोत. तीस मिनिटांत बहुमत सिद्ध करू शकतो' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी निर्णयानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'सत्य मेव जयते...' आणि 'सत्य परेशान हो सकता है...पराजित नही हो सकता...' असे दोन ट्विट केले आहेत. भाजपाला विधानसभेत तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली.
आज यावर निकाल देताना न्यायालयाने उद्याच (बुधवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करुन विश्वासदर्शक ठराव मांडून खुलं मतदान घ्या, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत 162 आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह 162 आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र राजभवनात सादर केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं. संजय राऊत यांनी मंगळवारी '162 आणि अधिक... वेट अँड वॉच' असं सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील सत्ता नाट्याचा नवा अंक सोमवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडला. महाविकास आघाडीच्या 162 आमदारांची तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर ओळखपरेड करण्यात आली. तसेच संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाच्या रक्षणासह मतदारसंघ आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ देण्यात आली.
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी अजित पवारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं त्यांना बहुमत सिद्द करण्याचे आदेश तातडीनं देण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. महाधिवक्ते तुषार मेहता आणि भाजपाचे वकील मुकूल रोहतगी यांनी बहुमत चाचणी शक्य तितकी पुढे ढकलली जाईल, अशा पद्धतीनं युक्तिवाद केला. तर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी तातडीनं विश्वासदर्शक मतदान करण्याची मागणी केली होती.