नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच हरियाणामध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरीही दिल्लीच्या भाजपाला चिंतेने ग्रासले आहे. कारण दोन्ही राज्यांमध्ये जागा कमी झाल्या आहेत.
भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते. मात्र, तिवारी यांच्या सभांचा काही उपयोग झालेला दिसत नाही. तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या त्या नेत्यांना पराभवाची धूळ चाटावी लागली आहे. हरियाणामध्ये भाजपा बहुमताने जिंकेल अशी अपेक्षाही फोल ठरली आहे. यामुळे दिल्लीच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसू लागला असून त्यांनी आपच्या दोन्ही राज्यांतील कामगिरीला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काल दिवसभर आपला ट्रोल केले जात होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक लढवत होता. या दोन्ही राज्यांमध्ये आपला 1 टक्केही मते मिळाली नाहीत. यावरून भाजपाच्या दिल्लीतील कार्यकर्त्यांनी आपला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती.
दिल्लीमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. येथील नेत्यांना वाटत होते की, हरियाणामध्ये मोठा विजय मिळाला तर दिल्लीमध्ये आपची सत्ता उलथवण्यास मदत होईल. दिल्लीमध्ये भाजपाच्या बाजुने वातावरण तयार होईल. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा घटल्याने आणि नेत्यांच्या सभांना अपयश आल्याने दिल्लीतील कार्यकर्ते निराश झाले आहेत. शेजारच्या राज्यातील निकालांचा दिल्लीतील राजकारणावर परिणाम होण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी या निकालांवरून आपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
भाजपाच्या नेत्यांनी म्हटले की, दोन्ही राज्यांमध्ये आपचा एकही उमेदवार डिपॉझिट वाचवू शकला नाही. आपचे नेते मतदारांना मोफत योजनांचे आमिष दाखवत होते, मात्र त्यांना नाकारले. महाराष्ट्रात आपला 0.12 आणि हरियाणात 0.43 टक्के मते मिळाली. तर भाजपा या दोन्ही राज्यांमध्ये सरकार बनविणार आहे. जर हरियाणामध्ये अशी हालत असेल तर दिल्लीत काय होईल असा टोलाही या नेत्यांनी लगावला आहे.