Maharashtra Heavy Rains and Floods: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे महाराष्ट्रातील एकूण 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये पुणे, सातारा, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशीम, यवतमाळ, धुळे, जालना, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर, नंदुरबार, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, नांदेड, अमरावती, वर्धा, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, गडचिरोली, सांगली, चंद्रपूर या शहरांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्ये 1 जून 2022 पासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत राज्याच्या या भागांमध्ये सरासरी 24.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये सात जण बेपत्ता असून 69 जण जखमी झाले आहेत. तसेच, 189 गुरे मरण पावली आहेत. महाराष्ट्रातील एकूण 275 गावांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पावसामुळे विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 44 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 1368 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
राज्यातील पूरग्रस्त भागातून आतापर्यंत 11836 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून 73 मदत शिबिरे चालवली जात आहेत. एनडीआरएफच्या 12 तुकड्या केंद्राकडून राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथे एनडीआरएफच्या 2-2 पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. एनडीआरएफची 1-1 टीम पालघर, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये मैदानात आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची चार पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. यापैकी एसडीआरएफची 2 पथके वर्धा, 1-1 नांदेड आणि गडचिरोलीमध्ये बचाव कार्यात सहभागी आहेत. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अहवालात पाऊस, वीज पडणे, दरड कोसळणे आणि झाडे पडणे यामुळे 105 लोकांचा मृत्यू जाल्याचे कारण देण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 12.8 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ वेधशाळेत गेल्या 24 तासांत 23.3 मिमी पावसाची नोंद झाली.