पुणे - ‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम मध्य भारतामध्ये अधिक जाणवणार आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बंगाल, महाराष्ट्राचा समावेश आहे. समुद्रकिनारच्या भागातही फटका बसण्याची शक्यता आहे.
२ ते ३ अंशांने वाढएप्रिल महिन्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तसेच, देशात १ ते ७ एप्रिलदरम्यानचे तापमान सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले जात आहे, त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारी महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये.-अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ