बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणे, पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीची बैठक घेणे आणि सीमाभागातील जनतेला मोफत आरोग्य सेवेबाबत महत्त्वाचे निर्णय बुधवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने होते.आसाम आणि मेघालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यात यावा, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार येत्या आठ दिवसांत महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचे ठरले. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन त्यामध्ये न्यायालयीन कामकाजामधील अडथळे दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.सीमाभागात मराठी भाषिकांना आरोग्य सेवा देताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. त्यामुळे सीमाभागातील 865 गावांतील मराठी जनतेला महाराष्ट्रात मोफत आरोग्य सेवा देण्याबाबत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र घेऊन येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसावर महाराष्ट्रात उपचार करण्यात येतील, असेही ठरले.सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच चंदगड येथे प्रांत दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. याबाबत याआधीही निर्णय झाला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही अध्यक्ष खासदार माने यांनी दिली.तज्ज्ञ समितीला सीमाभागातील माहिती मिळवून देण्यासाठी आणि इतर माहितीसाठी आज म. ए. समिती नेते ॲड. एम. जी. पाटील आणि ॲड. महेश बिर्जे यांची तज्ज्ञ समिती सल्लागारपदी नियुक्तीचा निर्णयही घेतला. ॲड. एम. जी. पाटील, ॲड. महेश बिर्जे, रमाकांत कोंडुसकर, ॲड. संतोष काकडे, विकास कलघटगी, कपिल भोसले, सागर पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, मुंबईत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:23 PM