नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असले तरी, देशातील ९१ जिल्ह्यांत अजूनही संसर्गाचा धोका आहे. यात महाराष्ट्रातील १५ जिल्हे आहेत. एकूण ८० टक्के रुग्ण याच जिल्ह्यांत आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. यात महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील सर्वाधिक १५-१५ जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त केरळमधील १४, ओडिशाचे ११, आंध्र प्रदेशमधील १०, आसामचे ९ आणि कर्नाटकच्या ६ जिल्ह्यांचाही समावेश आहे. ४ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अशा जिल्ह्यांची संख्या ४४० होती.कोरोना प्रतिबंधक लसीच्या अतिरिक्त (बुस्टर) डोसबाबत विचारले असता भार्गव यांनी सांगितले की, हा मुद्दा विचाराधीन आहे. लसीचा प्रभाव किती दिवस असेल, याची पूर्ण माहिती सध्या नाही. किती दिवस ॲन्टीबॉडी टिकतात, ही माहिती खूप महत्त्वपूर्ण असेल. असे मानले जाते की, कोरोनाचा संसर्ग झाल्यास ७ ते १२ महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी राहतात. लसीच्याबाबतीत हा अवधी किती असेल, याची माहिती कळायची आहे.आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १० मे ३७ लाखांहून कमी होऊन ४.६४ लाखांवर आली. रुग्ण बरे होण्याचा दर ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ८१.८ टक्के होता, तो वाढून ९७.२ टक्के झाला आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अनेक भागात कोरोना निर्बंध शिथिल केले जात असताना कोरोनासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
१७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांत धोका- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी जरूर होत आहे. परंतु, अजूनही १७ राज्यांतील ७३ जिल्ह्यांतील संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. यात सर्वाधिक जिल्हे अरुणाचल प्रदेशातील आहेत. त्यानंतर राजस्थानचे १०, मणिपूरचे ९, केरळचे ७, मेघालयातील ९ जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. - याशिवाय त्रिपुरा आणि सिक्कीममधील प्रत्येकी चार, ओडिशा आणि नागालँडमधील प्रत्येकी ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील फक्त एकाच जिल्ह्यात हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
३३ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग असलेल्या सर्वेक्षणानुसार असे आढळले की, २४ टक्के लोक मास्क लावत नाहीत. ४५ टक्के लोक योग्यप्रकारे मास्क लावत नाही. तसेच मास्क लावणाऱ्या लोकांची संख्या फक्त २९ टक्के आहे. ११ टक्केच लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत असल्याचे आढळले. लसीकरण केंद्रावर ४४ टक्के आणि प्रवासात केवळ १५ टक्केच लोकांनी कोरोना नियमांचे पालन केले, असे अग्रवाल यांनी सांगितले.
५९५ जिल्ह्यांतील संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा कमीभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले की, ६५ जिल्ह्यांतील लोकांंना संसर्ग होण्याचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. ५९५ जिल्ह्यांतील दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, हे चांगले संकेत आहेत. परंतु, ज्या ठिकाणी संसर्ग दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी खबरदारी घेत उपाययोजना करणे जरुरीचे आहे.