नवी दिल्ली - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसही अतिशय अजब आहे. जो व्यक्ती स्वतःचं सरकार वाचवू शकला नाही (कमलनाथ), त्याला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पाठवलं होतं. हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे असंच त्यांनीही केलं आणि बिचारे उद्धव ठाकरेही गेले. मला काँग्रेस आणि कमलनाथ दोघांच्याही विचाराची कीव येते. ना विकास करतात, ना लोकांचं कल्याण करतात. काँग्रेसकडे तर एकच नाथ आहेत, बाकी पूर्ण काँग्रेस अनाथ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देवेंद्र फडणवीस नाराज आहेत अशी चर्चा जोरदार रंगली होती. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस नाराज होते का? आणि दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? य़ावर भाष्य केलं आहे. "भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी कधीच काम करत नाही. देवेंद्रजी यांचं मन विशाल आहे. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील हाच निर्णय होता, तो निर्णय बदलला नाही. त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील ही जोड देण्यात आली. त्यामुळे कोणताच निर्णय बदलला नाही. फडणवीस सुरुवातीला सत्तेच्या बाहेर जाऊन आपला अनुभव शेअर करणार होते. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी आग्रह केला, त्यांनी सांगितलं की, तुमचा पाच वर्षांचा विकासाचा, प्रगतीचा, राज्याच्या विकासाच्या गतीचा जो अनुभव आहे तो त्यांच्या पाठीशी असावा. व्यक्तिगत निर्णय या पक्षात होत नाहीत. नेतृत्व जे विचारपूर्वक सांगतं त्यावर आम्ही अमलबजावणी करतो. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.