Congress Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेचे पडसाद दिल्लीतही उटमत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची मंगळवारी (11 जुलै) दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोब बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे प्रदेश प्रभारी एच के पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. .
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?या बैठकीचा फोटो शेअर करत खर्गे यांनी ट्विट केले की, “भाजपने वॉशिंग मशीन वापरुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम केले आहे. या राजकीय खेळाला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. भाजपकडून जनादेशावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय उत्तर देईल.आमचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू."
काय म्हणाले राहुल गांधी?काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. राज्यात पक्ष आणखी मजबूत करावा लागेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यावर आमचा भर आहे. तिथे सत्तेवर बसलेल्या जनविरोधी सरकारचा पराभव होईल, याची आम्हाला खात्री आहे."
बैठकीत काय चर्चा झाली?बैठकीनंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, आमची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असल्याने येत्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल. लोकांनी ते स्वीकारले आहे. दुसरीकडे, पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एएनआयला सांगितले की, बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाली.