लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशातील वातावरण पक्षाच्या बाजूने आहे. मात्र, अतिआत्मविश्वास न ठेवता आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि भावना आपल्याला कायम ठेवायच्या आहेत, असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या नेत्यांना सांगितले.
सोनिया गांधी म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली तर राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल होईल. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेण्याऐवजी मोदी सरकार अजूनही समुदायांमध्ये फूट पाडत असून, भीती आणि शत्रुत्व पसरवत आहे. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार उपस्थित होते.
गांधी म्हणाल्या...
जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही.आमचे किमान १२ कोटी नागरिक राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत.काही आठवड्यांत किमान ११ दहशतवादी हल्ले ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी.जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक असल्याचा दावा हास्यास्पद.मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत.
नियम का बदलले?
उत्तर प्रदेशातील कावड यात्रेच्या मार्गावर दुकानदारांची नावे लावण्याचा निर्णय का घेण्यात आला? सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप केला; परंतु तो केवळ तात्पुरता दिलासा असू शकतो. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी नियम अचानक बदलण्यात आले, असा दावा त्यांनी केला.