महाराष्ट्राची बस नर्मदेत कोसळली; १२ ठार, मध्य प्रदेशातील भीषण दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:57 AM2022-07-19T05:57:18+5:302022-07-19T05:58:01+5:30
खलघाट येथे दुपदरी पुलावर वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली.
भोपाळ/मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एमएसआरटीसी) एक एसटी बस इंदूरहून अमळनेरला जात असताना सोमवारी सकाळी १० ते १०.१५च्या दरम्यान मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातल्या खलघाट येथे नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये ३० ते ३२ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी १२ जणांचे मृतदेह हाती लागले असून, त्यातील ११ जणांची ओळख पटली आहे. त्यात बसचा चालक, वाहक, चार महिला व एका बालकाचा समावेश आहे.
मृतांपैकी बहुतांश लोक जळगाव जिल्ह्यातील, तर अन्य दोन जण अकोला, धुळे येथील रहिवासी आहेत. राजस्थानच्या चार रहिवाशांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या भीषण बस अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अपघातानंतर एनडीआरएफची मदत पथके तातडीने अपघातस्थळी रवाना झाली. बसमधील इतर प्रवाशांचा शोध सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांच्या वारसदाराला प्रत्येकी १६ लाख
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली. तसेच जखमी व्यक्तींच्या उपचारांचा सर्व खर्च एमएसआरटीसी करणार आहे.
- पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले. जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील.
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली.
नेमके प्रवासी किती होते?
तिकीट मशीनच्या जीपीएसनुसार बसमध्ये नऊ प्रवाशांची नोंद झाली आहे. ज्या हॉटेलसमोर बस थांबली होती, त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये सहा प्रवासी बसमधून नाश्त्यासाठी उतरल्याचे दिसत आहे. नऊ प्रवासी, वाहक -चालक असे ११ जण आणि एखादा प्रवासी नंतर बसला असल्याने त्याचे तिकीट आरक्षित असावे, अशी शक्यता आहे.
बस किती जुनी?
एमएसआरटीसीची ही बस १० वर्षे जुनी होती. या बसची नोंदणी नागपूर ग्रामीण प्रादेशिक वाहतूक कार्यालयात १२ जून २०१२ रोजी झाली होती. तिच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत १ वर्ष आणि दहा दिवसांनी संपणार होती. या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र, विमा कागदपत्रे वैध आहेत असे आरटीओने म्हटले आहेत. बस नंबर MH-40 N-9848
कशी घडली घटना?
- खलघाट येथे दुपदरी पुलावर वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली.
- वेगवान प्रवाहामुळे नर्मदा नदीत मृतदेह सापडणे मुश्कील होते.