आधीच उष्णकटिबंधीय देश म्हणून ओळख असलेल्या आपल्या देशात उष्णतेचे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे. दरवर्षी उष्माघाताच्या बळींमध्ये वाढही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या ५० वर्षांच्या उष्णतामानाचा अभ्यास अलीकडेच करण्यात आला. उष्णतेच्या लाटांचे ३ नवीन हॉटस्पॉट देशात निर्माण झाल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रातील काही भागांचा समावेशही आहे.
कोणी केला अभ्यास?भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि महामना सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लायमेट चेंज रिसर्च (एमसीईसीसीआर) यांनी संयुक्तपणे बनारस हिंदु विद्यापीठात भारतातील बदलते हवामान या विषयावर अभ्यास केला.७० वर्षांच्या कालावधीत देशाच्या विविध उपविभागांमध्ये गेल्या उष्णतामानात काय बदल झाला, याचा सखोल अभ्यास यावेळी करण्यात आला. त्याचा निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमेटॉलॉजी या मासिकात प्रकाशित करण्यात आला.
काय आढळले अभ्यासात?वायव्य, मध्य आणि दक्षिण-मध्य भारत या तीन टापूंमध्ये अलीकडच्या काळात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले.त्या दृष्टीने हे तीनही टापू उष्णतेच्या लाटांचे नवीन केंद्र (हॉटस्पॉट) बनल्याचा निष्कर्ष अभ्यासात काढण्यात आला.
विदर्भात लाटांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षांत मध्य महाराष्ट्रातही लाट वाढली आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेडचा काही भाग या ठिकाणी लाटा अधिक तीव्र झाल्या आहेत. याशिवाय विदर्भातील इतर जिल्ह्यांतही उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. खांदेशातही उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत.
परिणाम काय?पश्चिम बंगाल, बिहारपासून वायव्येकडे तसेच मध्य आणि दक्षिण मध्य भारतातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारींत वाढल्या.मध्य भारताकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढल्याने या टापूतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले.शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था यांच्यावरही उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला.