नाशिक - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिक येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. दरम्यान, पाकिस्तानी पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याचाही मोदींनी समाचार घेतला. काँग्रेसचं कन्फ्युजन समजू शकतो. पण शरद पवार यांनी व्होटबँकेच्या राजकारणासाठी केलेल्या चुकीच्या वक्तव्यांमुळे दु:ख झाल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तानचा आवर्जुन उल्लेख केला. आपल्याच देशातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शत्रूचा फायदा होत असल्याचा टोला मोदींनी लगावला. यावेळी पाकिस्तानी पाहुणचार भावला, असे सांगणाऱ्या शरद पवार यांच्यावरही मोदींनी घणाघाती टीका केली. ते म्हणाले, ''काँग्रेसी नेत्यांचे कन्फ्युजन मी समजू शकतो, पण शरद पवार? केवळ व्होटबँकेच्या राजकारणासाठी शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते जेव्हा अशी चुकीची वक्तव्ये करतात तेव्हा दु:ख होते. त्यांना शेजारील देश चांगला वाटतो, ही त्यांची मर्जी. तेथील शासक, प्रशासक चांगले वाटतात, हे सुद्धा त्यांचेच निरीक्षण आहे. पण दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे, अत्याचार आणि शोषणाची छायाचित्रे कुठून येतात हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश जाणतो.'' असा टोला मोदींनी शरद पवार यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानात माझे चांगले स्वागत झाले. भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात असे शरद पवार यांनी म्हटले होते. पाकिस्तानमध्ये लोकांवर अन्याय होतो, असे भारतातील काही लोक म्हणतात हे खोटे आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात असे सांगत पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली होती.