नवी दिल्ली : एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत जीएसटीची वसुली कमी झाली असून, राज्यांना द्यावयाच्या भरपाईची रक्कम १.५१ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिली. सन २०२०-२१ या वर्षामध्ये राज्यांना देण्याच्या अनुदानात महाराष्ट्राला २२,४८५ कोटी रुपये मिळणार असून, ही रक्कम सर्वाधिक ठरली आहे.कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी व्यापार व उद्योग बंद राहिले होते. त्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत जीएसटी वसुली मोठ्या प्रमाणात घटली आहे. जीएसटी कायद्यानुसार वसुलीमध्ये घट आल्यास निर्माण होणाऱ्या तुटीसाठी केंद्र राज्यांना अनुदान देत असते.सन २०२०-२१ या वर्षासाठीच्या हंगामी अनुदानाच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्यास्थानी आहे. कर्नाटक (१३,७७६ कोटी), उत्तर प्रदेश (११,७४२ कोटी), गुजरात (११,५६३ कोटी) आणि तामिलनाडू (११,२६९ कोटी) ही राज्ये महाराष्ट्रापाठोपाठ आहेत. पश्चिम बंगाल (७,७५० कोटी), केरळ (७,०७७ कोटी), राजस्थान (६,३११ कोटी) आदी राज्ये या यादीत प्रमुख आहेत.
जीएसटी अनुदानापोटी महाराष्ट्राला मिळणार २२ हजार ४८५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:20 AM