महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:33 PM2022-05-03T13:33:08+5:302022-05-03T13:34:02+5:30
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, बोम्मई यांचं आवाहन.
बंगळुरू : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सीमा प्रश्नाचा वापर करू नये, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी करताना इंचभरही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या अनेक भागांत कन्नड भाषा बोलणारे भाग असून त्यांना कर्नाटकमध्ये समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे, असे बोम्मई वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेजारच्या कर्नाटक राज्याच्या सीमा भागांत राहत असलेल्या मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीच्या लढ्याला पाठिंबा कायम राहील, असे रविवारी म्हटले होते.
या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना बोम्मई म्हणाले की, “महाऱाष्ट्रात संपूर्ण सरकारसमोर राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्यामुळे ते भाषेचे भूत निर्माण करतात व सीमा प्रश्न उपस्थित करतात. राजकारणात टिकून राहण्यासाठी ते असे करतात.” सीमा प्रश्नावर कर्नाटकची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.