नवी दिल्ली : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण ६ पुरस्कार पटकाविले आहेत. सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९’ चे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा सलग दुसºयांदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख अॅड. विनोद तिवारी यांनी पुरस्कार स्वीकारला. नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण ६ विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.
पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हयाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसºया क्रमांकांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.