सीमा महांगडे
कोलकाता : ‘महिलाही रणी ठाकल्या’ असे म्हणत पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत महिला वैज्ञानिक व उद्योजिका यांच्यावर आयोजित २ दिवसीय परिषदेत महिला सक्षमीकरणाचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात महाराष्ट्रीयन महिलांचा दबदबा चर्चासत्रात आणि कामगिरी सादरीकरणात दिसून आला.
स्वकर्तृत्वावर, मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर हळूहळू स्वत:ची व समाजाची प्रगती साधणाºया महिलांच्या या सत्रात महाराष्ट्राच्या मेळघाटात समाजकार्य करणाºया निरुपमा देशपांडे, अकोलेच्या फूड मदर म्हणून ओळखल्या जाणाºया शेतकरी ममताबाई आणि हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावणाºया पुण्याच्या स्मिता घैसास यांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्रीयन महिलांनी आपला जोर दाखवून दिला.महिला वैज्ञानिक व उद्योजिकांच्या दुसºया दिवशीच्या सत्रात साध्या राहणीमानातून प्रसिद्धीस आलेल्या आणि आज जगासाठी प्रेरणा ठरणाºया महिलांना वक्ते म्हणून मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील अकोले येथील ममताबार्इंनी तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी आणि नाकात नथ असा पेहराव असलेल्या ममताबार्इंनी वर्मी ब्रीकेडचा (गांडूळ खतांच्या गोळ्या) वापर आणि मुळात त्याचे संशोधन कसे केले याची उकल सादरीकरणाद्वारे केली तेव्हा देशाच्या निरनिराळ्या कोपºयांतून आलेल्या उच्चशिक्षित महिलाही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत राहिल्या. साधे नैसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबार्इंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे ममताबाई निरक्षर आहेत. पण त्यांचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात.
शेतीचे धडे देऊन ममताबाई महिला शेतकºयांना समृद्ध करत आहेत तर स्मिता घैसासही आपल्या कार्यातून गेल्या ३५ वर्षांपासून शेतकरी / महिलांना आर्थिक सक्षमता व संपन्नता मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या सुयश चॅरिटेबलद्वारे करत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व आसाम या राज्यांतील ३५०० पेक्षा जास्त गावांमध्ये कृषिविकासातून सुयशचे काम पोहोचले आहे.