लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्प व्यवस्थित पूर्ण व्हावा यासाठी एका नोंदणी क्रमांकाच्या प्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे. मात्र, १७८१ गृहनिर्माण प्रकल्पांनी त्यांची बँक खाती एकापेक्षा जास्त प्रकल्पांशी जोडली आहेत. परिणामी महारेराने याची दखल घेत ४५ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, उर्वरित प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे.
महरेराने गृहनिर्माण प्रकल्पांची झाडाझडती सुरू केली असून, भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून एका प्रकल्पाचे खाते दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटकाव होईल. कारण आता तसे बदल संगणकीय प्रणालीत करण्यात आले आहेत. शिवाय आता बिल्डरने परस्पर खाते बदल करायचा प्रयत्न केल्यास तेही होणार नाही. कारण महारेराने नवीन आदेश काढून या बदलासाठी पूर्व परवानगी अत्यावश्यक केली आहे.
राज्यात लहान-मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी महारेराने पावले उचललेली आहेत. प्रकल्पांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे सूक्ष्म संनियंत्रण महारेराने केले आहे. गेल्या आठवड्यात महारेराने ३१३ प्रकल्पांवर रेड फ्लॅग लावून त्यांची तपासणी सुरू केली आहे. या सर्व ३१३ प्रकल्पांनाही कारणे दाखवा नोटीस यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. त्यांची छाननी सुरू आहे.बिल्डर्सने महारेराकडे सादर केलेल्या माहितीचा अभ्यास करून महारेराने अनियमितता अधोरेखित केली आहे. अनियमिततेची दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.