महाशिवरात्री जोड
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
पाताळेश्वर शिवमंदिर, महाल
पाताळेश्वर शिवमंदिर, महालमहालातील पाताळेश्वर शिवमंदिर हे स्वयंभू आहे. भोसल्यांच्या काळात पाताळेश्वर प्रवेशद्वाराची निर्मिती करीत असताना शिवलिंगाचे दर्शन झाले होते. या मंदिराप्रति भाविकांची मोठी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला शहराच्या बाहेरूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात. आज सकाळी शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची दर्शनाला सुरुवात झाली होती. रात्रीला महाआरती करण्यात आली. रात्रभर जागरणाचा कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कल्याणेश्वर मंदिर, महाल इक्षुरसात (उसाचा रस) लक्ष्मीचा वास असल्याने कल्याणेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला इक्षुरसाचा अखंड अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकातर्फे नि:शुल्क इक्षुरसाचा ग्लास अभिषेकासाठी देण्यात येत होता. सकाळी ११ वाजतापासून अभिषेकाला सुरुवात झाली. रात्री ११ ला अभिषेकाची समाप्ती झाली. यादरम्यान अखंड महारुद्राचा मंत्रोपच्चार सुरू होता. जवळपास ५० हजारावर भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. प्रत्येक भाविकांना उपवासाच्या पदार्थांचा प्रसादही वितरित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक मंडळ बालाजीनगर विस्तारबालाजीनगर विस्तारमधील विश्वशांती मानव सेवाश्रमतर्फे आयोजित संत गजानन महाराज मंदिरातून महाशिवरात्रीनिमित्त भव्य पालखीचे आयोजन करण्यात येते. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे मनोहर मोटघरे, विठ्ठलराव सांडे, गोविंदराव ढोक, दत्तू वाघाडे, विजय आडोकार, संजय धुर्वे, लक्ष्मण मानकर, अंबादास मानकर यांनी पालखीचे स्वागत केले. स्वागतासाठी बर्फाचे शिवलिंग साकारले होते. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखीत सहभागी भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. टाळमृदंगाच्या गजरात पालखीने संपूर्ण परिसरात भ्रमण केले. मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होते. शिवगौरी नागनाथ मंदिर, चंदननगरचंदननगर येथील श्री शिवगौरी नागनाथ मंदिर सेवा ट्रस्टद्वारे महाशिवरात्री उत्सव धार्मिक वातावरणात करण्यात आला. सकाळी ६ वाजता शिवाभिषेक व महाआरती करण्यात आली. दुपारी भजनांचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २२ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा साजरा होणार आहे. २२ ला आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हभप प्रमोद हिवरे महाराजांचे गोपालकाल्याचे कीर्तन होईल.