आग्रा: संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचे (Mahashivratri 2021) पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भाविक मंदिरांमध्ये जाऊन शिवदर्शन घेत आहेत. अनेक ठिकाणी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, दिल्लीतील आग्रा येथे असलेल्या ताजमहाल (Taj Mahal) येथे हिंदू महासभेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवपूजन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिंदू संघटनेचे दोन कार्यकर्ते आणि एका महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (mahashivratri 2021 three arrested at taj mahal for performing shiv puja)
ताजमहाल येथे जाऊन हिंदू महासभेचे कार्यकर्त्यांनी पूजा आणि आरती केली. काही हिंदूत्ववादी संघटना ताजमहालला शिवस्थान मानतात. म्हणूनच महाशिवरात्रीच्या निमित्ताने ताजमहाल येथे जाऊन या कार्यकर्त्यांनी महादेव शिवशंकराची आराधना केली. सेंट्रल टँक येथील डायना बेंच येथे हिंदू महासभेच्या प्रांत अध्यक्षा मीना दिवाकर विधिपूर्वक आरती करू लागल्या. याच वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना अटक केली. यावेळी मीना दिवाकर यांच्यासोबत दोन कार्यकर्ते उपस्थित होते.
Mahashivratri 2021: तब्बल १०१ वर्षांनी जुळून येताहेत अद्भूत शुभ योग; वाचा, महत्त्व व मान्यता
मीना दिवाकर यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून या तीन जणांची चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट आणि जिल्हाध्यक्ष रौनक ठाकूर काही कार्यकर्त्यांसह दिल्लीतील ताजगंज पोलीस स्थानकात गेले.
दरम्यान, ताजमहाल येथे तीन दिवसीय शाहजहानचा उर्स सुरू आहे. नियमानुसार, ताजमहाल येथे परंपरागत नमाज अदा केली जात आहे. उर्सशिवाय कोणताही धार्मिक विधी करण्यावर ताजमहाल येथे बंदी घालण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे, काही हिंदूत्ववादी संघटना ताजमहालला शिवाचे स्थान मानतात. ताजमहाल पूर्वी शिवमंदिर होते, असा दावा काही संघटनांकडून केला जातो. काही दिवसांपूर्वी ताजमहाल परिसरात एका हिंदू संघटनेने हनुमान चालीसा पठण केले होते.