जैसलमेर: महाशिवरात्रीमध्ये देशभरात ठिकठिकाणी भगवान शंकराची, पिंडीची पूजा अर्चा केली जाते. रुद्राभिषेक घातला जातो. परंतू, असे एक प्राचीन मंदिर आहे जिथे शंकराच्या पिंडीला ना कधी अभिषेक केला जात ना पूजा केली जात.
जैसलमेरपासून 15 किलोमीटर दूरवर असलेल्या लोद्रवा गावात हे शिवमंदिर आहे. या मंदिरात शेकडो वर्षांपासून शंकराची पूजा केली जात नाही. जलाभिषेकही होत नाही. महाशिवरात्रीलाही हे केले जात नाही. गावातील काही लोक या पिंडीवर फुलांचा हार घालतात एवढेच काय ते होते. या शिवमंदिरात चतुर्मुखी शंकराची प्रतिमा आहे.
लोद्रावा गावात बसलेले भगवान शंकर आजच्या दिवशीही भक्तांची वाट पाहत आहेत. गावातील लोक मंदिरात जाऊन शंकरासमोर दिवा लावत असले तरी आजही येथे विधिवत पूजा केली जात नाही. मोहम्मद घौरी भारतात आल्यावर या मार्गाने आल्याचे सांगितले जाते.जैसलमेरमध्ये भाटी घराण्याची सत्ता होती. पण भाटी घराण्याआधी जैसलमेरवर परमार घराण्याची सत्ता होती. परमार हे शंकराचे भक्त होते. जैसलमेरमध्ये अनेक ठिकाणी शिवमंदिरे बांधण्यात आली. परंतु वेळोवेळी बाह्य आक्रमनांनी ही मंदिरे उद्ध्वस्त केली.
गावकरी अजित सिंह लोद्रावा यांनी सांगितले की, जैसलमेरवर महारावल जैसल यांचे राज्य होते. मोहम्मद घोरीने ११७८ मध्ये हल्ला केला, तेव्हा त्याने अनेक मंदिरे पाडली. लौद्रवाच्या या शिवमंदिराचाही यात समावेश होता. या हल्ल्यानंतर हे गाव निर्मनुष्य झाले होते. मंदिरात चतुर्मुखी शिवलिंग असून त्यावर भगवान शंकराचे मुख कोरलेले आहे. मात्र भग्न झाल्याने येथे पूजा केली जात नाही. महाशिवरात्रीला ग्रामस्थ येून भजन कीर्तन करतात, पुजा करत नाहीत. दिवा लावतात असे ते म्हणाले.