नवी दिल्ली : महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.अहमदाबाद येथील दीनानाथ बात्रा यांच्या पुनरुत्थान विद्यापीठाने तयार केलेल्या भारतीय शिक्षा ग्रंथमाला (इंडियन एज्युकेशन मॅन्युअल) च्या उद्घाटनप्रसंगी भागवत बोलत होते. दीनानाथ बात्रा हे शिक्षण पद्धतीविषयीच्या वक्तव्यांमुळे बºयाच वेळा वादग्रस्त ठरले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रा येथे आयोजित केलेल्या संबंधित संघटनांच्या मंथन शिबिरात जवळपास सर्व वक्त्यांनीच शिक्षण पद्धती बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, मेकॉलेची शिक्षण पद्धती पाश्चिमात्य म्हणून ओळखली जाते. मात्र स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्य लढ्यातील सारेच जण याच शिक्षण पद्धतीतून पुढे आले. पण त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही.त्यामुळे तुम्ही कोणत्या शिक्षण पद्धतीत शिकता, यावरच सारे संस्कार अवलंबून नसतात. पाल्यांवरील संस्काराची जबाबदारी पालकांचीही असते, असे सांगून भागवत म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवा, याबाबत समाजात सहमती निर्माण होत आहे. मात्र सारे काही त्यावरच अवलंबून असते, असे नव्हे.
महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव नव्हता - मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:00 AM