मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याविषयी काही माहिती आपण पाहूया.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९३० साली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची घोषणा केली याची सुरूवात दांडी यात्रेने झाली.
मिठाचा सत्याग्रह हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. महात्मा गांधींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती. यावेळी दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक महात्मा गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते. २४ दिवस आणि ३९० किलोमीटर ही यात्रा चालली होती. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला दांडीला पोहोचली होती.
महात्मा गांधी यांनी काढलेली ही दांडी यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्न ठरली. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादी ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली होती.