लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर सरकारी इमारतींना भगव्या रंगानं रंगवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. परंतु उत्तर प्रदेशमधल्या शाहजहांपूरमध्ये भगव्या रंगावर प्रेम करणा-यांनी चक्क गांधींचं भगवेकरण केलं आहे. गांधीजींचा पुतळा भगव्या रंगात रंगवल्यानं परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.शाहजहांपूरमधल्या ढाका घनश्यामपूर गावात हा प्रकार घडला आहे. जिथे 20 वर्षांपूर्वी महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात आला होता. 20 वर्षांपासून असलेल्या या पुतळ्यावर एका रात्रीत भगवा रंग चढवण्यात आला आहे. पण पुतळ्याच्या खाली पांढ-या रंगात राष्ट्रपिता असं लिहिलं आहे. भगव्या रंगात रंगवण्यात आलेला गांधीजींचा पुतळा गेल्या 20 वर्षांपासून सफेद रंगात होता. या प्रकरणात कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. तर विश्व हिंदू परिषदेनं या पुतळ्यांचं भगवेकरण करण्याच्या प्रकाराला पाठिंबा दर्शवला आहे. जिल्हा प्रशासनानं याची चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे.परंतु गांधीजींचा पुतळा भगव्या रंगात कोणी रंगवला याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. विश्व हिंदू परिषदेचे राजेश अवस्थी म्हणाले, भगवा हा संतांचा रंग आहे. पुतळ्यांना भगवा रंग देण्याचे प्रकार सुरूच राहतील. गांधीजींच्या पुतळ्याचं भगवेकरण करण्यास भाजपाचा हात असल्याचं परिसरातील काही लोकांचं म्हणणं आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शौचालयही भगव्या रंगानं रंगवण्यात आल्याचं समोर आलं होतं.
योगींच्या राज्यात आंबेडकरांनंतर आता महात्मा गांधींचंही भगवेकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 8:54 PM