नवी दिल्ली- इंग्रजांच्या शासन काळात मिठावर लावण्यात येणाऱ्या कराविरोधात गांधीजींनी दांडी मार्च काढून त्याचा निषेध नोंदवला होता. त्याच दांडी मार्चला आज 89 वर्षं पूर्ण झाली आहेत. याच निमित्तानं मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला विसर्जित करण्यात यावं ही राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छा होती. काँग्रेसनं नेहमीच जातीयवादी संस्कृतीला खतपाणी घातलं आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेस विसर्जित करायची होती.दांडी यात्रेच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्तानं मोदींनी एक ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉगमध्ये ते लिहितात, लोकशाहीच्या मूल्यांप्रति काँग्रेसला कोणतीही आस्था नाही. गांधीजींनी काँग्रेसची संस्कृती चांगल्या प्रकारे ओळखली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेस विसर्जित करायची होती. गांधीजींनी 1947मध्ये सांगितलं होतं की, भारताचं सन्मानाचं रक्षण करावं हे समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व बुद्धिजीव आणि नेत्यांचं कर्तव्य आहे.मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. कुशासन आणि भ्रष्टाचार फोफावल्यास देशाच्या सन्मानाचं रक्षण होणार नाही. भ्रष्टाचारावर मोदी म्हणतात, कुशासन आणि भ्रष्टाचार एकमेकांना प्रोत्साहन देतात. आमच्या सरकारनं भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे एकमेकांसाठी पर्याय ठरू लागले आहेत. कुठल्याही सेक्टरमध्ये काँग्रेसनं भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. काँग्रेसनं घोटाळा न केलेलं एकही क्षेत्र शिल्लक नाही.
काँग्रेस विसर्जित व्हावी ही तर गांधीजींची इच्छा- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:34 PM