राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी रात्री महात्मा गांधींच्या पुतळ्याचे शीर धडावेगळे करुन ते कचऱ्यात टाकले. रात्री एकच्या सुमारास चार-पाच जण परिसरात आले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. याच लोकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सकाळच्या सुमारास पुतळ्याची विटंबना झाल्याची बाब स्थानिकांच्या लक्षात आली. गांधीजींच्या पुतळ्यावर शीर नसलेले बघून स्थानिक संतप्त झाले. याप्रकरणी पोलीस अधिकारी महिपाल सिंह यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु असून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक केली जाईल, असे सिंह यांनी सांगितले. गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी लवकर पकडले न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; लोकांमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 12:37 PM