पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारताची महिला कुस्तीपटूविनेश फोगट हिने निवृत्ती जाहीर केली आहे. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विनेशचे काका महावीर फोगट यांनीही निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून हा निर्णय मागे घेण्याबाबत सांगितलं आहे.
विनेश फोगटलाकुस्ती शिकवणारे तिचे काका महावीर फोगट म्हणाले की, "विनेश जेव्हा येईल तेव्हा ते तिला समजावून सांगतील की तिला अजून खेळायचं आहे आणि तिने निवृत्तीचा हा मोठा निर्णय बदलावा. आम्ही तिला हिंमत हारू नकोस असं सांगू आणि आतापासून २०२८ च्या ऑलिम्पिकची तयारी सुरू करू."
विनेशने निवृत्तीचा हा निर्णय तडकाफडकी का घेतला, असं विचारलं असता? यावर महावीर फोगट म्हणाले की, कोणताही खेळाडू जेव्हा या पातळीपर्यंत पोहोचतो आणि नंतर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो रागाच्या भरात असे निर्णय घेतो. ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त असल्याने विनेश फोगटला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं.
"विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा"
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. "हरियाणाची आमची शूर कन्या विनेश फोगट हिने जबरदस्त कामगिरी करून ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता, काही कारणांमुळे ती ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नाही, पण ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे."
"आमच्या सरकारने ठरवलं आहे की, विनेश फोगटचं स्वागत आणि अभिनंदन हे एका मेडलिस्टसारखंच केलं जाईल. हरियाणा सरकार सिल्वर मेडल विजेत्याला जो सन्मान, बक्षीस आणि सुविधा देतं, त्या सर्व विनेश फोगटला दिल्या जातील. आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश!" असं हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.