'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:02 PM2024-09-09T17:02:28+5:302024-09-09T17:03:03+5:30

Mahavir Phogat on Vinesh Phogat : महावीर सिंह फोगट यांनी विनेश फोगटच्या काँग्रेस प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.

Mahavir Phogat on Vinesh Phogat 'She shouldn't have entered politics' Uncle Mahavir Singh Phogat is upset over Vinesh's entry into Congress | 'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज

'तिने राजकारणात जायला नको होते', विनेशच्या काँग्रेस प्रवेशावर काका महावीर सिंह फोगट नाराज

Mahavir Phogat on Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच, ती आगामी हरियाणा विधानसभा निवडणूकही लढवणार आहे. पण, तिचा राजकारणात येण्याचा निर्णय काका आणि कुस्तीगुरू महावीर सिंग फोगट (Mahavir Singh Phogat) यांना मुळीच आवडला नाही. त्यांनी याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

काय म्हणाले महावीर फोगट?
'विनेशच्या राजकारणात येण्याच्या मी आधीपासून विरोधात होतो. तिने2028 च्या ऑलिम्पिकची तयारी करावी आणि त्यात खेळावे, अशी माझी इच्छा आहे. सुवर्णपदकाची इच्छा तिने पूर्ण करावी. खेळाडूंनी खेळात सर्व आशा गमावल्यानंतरच राजकारणात यावे. विनेशने एक ऑलिम्पिक लढवून नंतर राजकारणात उतरायला हवे होते', अशी प्रतिक्रिया महावीर फोगाट यांनी दिली आहे. यावरुन ते विनेशच्या निर्णयाने नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनेश-बजरंगचा काँग्रेस प्रवेश
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर दोघांनी एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, हरियाणा सरचिटणीस दीपक बाबरिया, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि काँग्रेस मीडिया आणि प्रचार विभाग प्रमुख पवन खेडा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जुलाना येथून निवडणूक लढवणार
विनेश फोगट हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर विनेश फोगट यांनी भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, मी देशातील जनता आणि मीडियाचे आभार मानते. माझ्या कुस्तीच्या प्रवासात तुम्ही मला साथ दिली. मी काँग्रेस पक्षाचे विशेष आभार मानते, कठीण काळात पक्ष माझ्या पाठिशी उभा होता. आम्हाला रस्त्यावर ओढले गेले, तेव्हा भाजप वगळता सर्व पक्ष आमच्या पाठीशी उभे राहिले. आम्ही आता घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही, असे विनेश म्हणाली. 

Web Title: Mahavir Phogat on Vinesh Phogat 'She shouldn't have entered politics' Uncle Mahavir Singh Phogat is upset over Vinesh's entry into Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.