नवी दिल्ली - बनारस हिंदू विद्यापीठाच्या मुख्य परीक्षाधिकारी (chief proctor) पदी महेंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बनारस हिंदू विद्यापीठाचे मुख्य परीक्षाधिकारी (Chief Proctor) ओंकारनाथ सिंह यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाची राजीनामा सुपूर्द केला होता. ओंकारनाथ सिंह यांच्या राजीनाम्यानंतर महेंद्र कुमार सिंह बनारस हिंदू विद्यापीठाचे नवे मुख्य परीक्षाधिकारी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आता महेंद्र कुमार सिंह यांची प्रॉक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांवर लाठीमार करणा-यांवर कारवाई; तीन दंडाधिकारी, दोन पोलिसांना हटविलेदरम्यान, छेडछाडीच्या विरोधात निदर्शने करणा-या बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने तीन अतिरिक्त शहर दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिका-यांना हटविले.विद्यापीठातील हिंसाचारप्रकरणी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यपाल राम नाईक यांनी बनारस हिंदू विद्यापीठात घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. छेडछाडीच्या विरोधात शनिवार रात्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यात अनेक जण जखमी झाले होते. काही विद्यार्थी कुलगुरूंना भेटण्यास आग्रही होते. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यावरून काँग्रेसने उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
समिती करणार चौकशीविद्यापीठात घडलेला प्रकार दु:खद असल्याचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. पोलिसांच्या वर्तनासह इतर पैलूंनी समिती चौकशी करील, असे राज्यपालांनी पत्रकारांना सांगितले होते.