रायपूर – छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील शिक्षक भरतीसाठी आलेल्या एका अर्जामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. आत्मानंद इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. या ऑनलाईन अर्जात चक्क भारतीय क्रिकेट टिमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी(MahendraSingh Dhoni) याने अर्ज केल्याने अधिकारी चक्रावले.
इतकचं नाही तर महेंद्र सिंग धोनी यांच्या वडिलांचं नाव सचिन तेंडुलकर लिहिल्याचं निदर्शनास आलं. या अर्जात ९८ टक्के मार्काने पास झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शिक्षण विभागानं निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार केली. मात्र त्यानंतर शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. संपूर्ण राज्यात इंग्रजी माध्यमासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉडल शाळा तयार करण्यात आली आहे. या शाळांमध्ये इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहेत.
रायगडमधील इंग्रजी शाळेतील शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. ऑनलाईन अर्जात एका उमेदवाराने शिक्षक भरतीसाठी फॉर्म भरला होता. या उमेदवाराचं नाव महेंद्र सिंग धोनी होतं तर वडिलांचे नाव सचिन तेंडुलकर सांगितलं होतं. ९८ टक्के मार्क असल्याने निवड समितीने महेंद्र सिंग धोनी नावाच्या उमेदवाराचं नाव निवड सुचीत टाकलं. उमेदवाराने अर्जात म्हटलं होतं की, त्याने सीएसवीटीयू, दुर्ग येथून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. चांगल्या मार्कानं पदवीधर असल्याने अर्जाकडे विभागाने दुर्लक्ष केले नाही.
पहिल्या नंबरवर महेंद्रसिंग धोनीचं नाव
विभागाने तयार केलेल्या निवड सुची यादीत पहिल्याच क्रमांकावर महेंद्र सिंग धोनीचं नाव लिहिलं होतं. मुलाखतीसाठी जेव्हा उमेदवाराला बोलावलं तेव्हा तो आला नाही. त्यानंतर निवड समितीच्या अधिकाऱ्यांना ही बाब खटकली. एवढी मोठी चूक शिक्षण विभागाकडून झाली कशी? याची चर्चा अधिकाऱ्यांमध्येच सुरू झाली. कटऑफ मार्क असल्याने उमेदवाराची निवड करण्यात आली. उमेदवाराचा अर्ज भलेही अजब असला तरी अर्जातील इतर बाबींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असं काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता FIR ची तयारी
सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटमधील देव मानलं जातं. महेंद्र सिंग धोनी यांच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधीत आहे. अशावेळी धोनी आणि तेंडुलकर यांच्या नावाचा वापर करून शिक्षण विभागाची चेष्टा करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी सुरू आहे. उमेदवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अर्जातील मोबाईल नंबर बंद येत आहेत. उमेदवार रायपूरचा असल्याचं अर्जात म्हटलं आहे.