बुलंदशहर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सिकंदराबाद येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना महेश शर्मा यांनी राहुल गांधी यांचा पप्पू तर प्रियंका गांधी यांचा उल्लेख 'पप्पी' म्हणून केला आहे. प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करताना शर्मा यांची जीभ घसरली आहे.
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी 'संसदेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागच्या बाकावर बसलो होतो. राहुल गांधींनी डोळा मारलेला पाहून मी देखील घायाळ झालो होतो. पप्पू म्हणतोय की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आता मायावती, अखिलेश यादव, पप्पू आणि पप्पूची पप्पीदेखील आली आहे' असं वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच 'प्रियंका गांधी याआधी देशाची मुलगी नव्हती का? काँग्रेसची मुलगी नव्हती का? अशी कोणती नवीन गोष्ट त्या करणार आहेत ? याआधी ती सोनिया गांधींची मुलगी नव्हती का… पुढे राहणार नाही का ? आधी नेहरु, नंतर राजीव गांधी, नंतर संजय गांधी, नंतर राहुल गांधी आणि नंतर प्रियंका गांधी….भविष्यात अजून काही गांधी असतील. तुम्ही काय देशावर उपकार केले आहेत का?' असं ही शर्मा म्हणाले.
शर्मा यांनी या सभेत ममता बॅनर्जींसह इतर नेत्यांवरही टीका केली आहे. 'ममता बॅनर्जींनी येथे कथ्थक नृत्य केलं आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी गाणं गायलं तर त्यांचं कोण ऐकणार? ते 200 जागा कुठून आणणार? असं ही त्यांनी म्हटलं आहे. त्यांना भक्कम सरकार नको तर त्यांना कमकुवत सरकार हवं असल्याची टीकाही शर्मा यांनी केली आहे.
भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी काही महिन्यांपूर्वी प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची अफवा पसरवली जाते, तर कधी करिना कपूर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते.' असे वादग्रस्त वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केले होते.
राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरलीभाजपाच्या उत्तर प्रदेशचे वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे रावण तर त्यांची बहीण प्रियंका गांधी या शूर्पणखा असल्याचे वक्तव्य केले होते. सुरेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये रावणाची संस्कृती असून प्रजातांत्रिक युद्ध लढण्याचा आरोप लावला होता. राहुल गांधी यांची तुलना रावण आणि प्रियंका गांधी या शुर्पणखा या रामायणातील पात्रांशी केली आहे. रावणाने जसे रामासोबतच्या युद्धावेळी शूर्पणखेला पाठवले होते, तसेच राहुल यांनी बहिण प्रियंका हिला पाठविले आहे. तसेच राहुल यांनी प्रियंका यांच्याकडे नेतृत्व देऊन आपले अपयश मान्य केल्याचा आरोप केला होता.