ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - सुषमा स्वराज या नौटंकी करण्यात माहीर असल्याची बोचरी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. तर स्वराज कुटुंबाला ललित मोदींकडून किती पैसे मिळाले हे सुषमा स्वराज यांनी जाहीर करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
गुरुवारी लोकसभेत उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी ललित मोदींच्या मरणासन्न पत्नीला माणूसकीच्या दृष्टीने मदत केली असे म्हटले होते. माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. स्वराज यांच्या स्पष्टीकरणावर शुक्रवारी सोनिया गांधी व राहुल गांधींनी भाष्य केले. मी माणूसकीच्या दृष्टीने महिलेला मदत केली असती पण त्यासाठी मी कायद्याचे उल्लंघन केले नसते असे सडेतोड उत्तर सोनिया गांधींनी दिले.
सुषमा स्वराज यांच्या विधानाविषयी राहुल गांधी म्हणाले, चोर दबक्या पावलाने येऊन चोरी करुन जातो, त्याचप्रमाणे सुषमा स्वराज यांनी सर्वांपासून लपून ललित मोदींना मदत केली. सुषमा स्वराज यांनी जे केले ते माझ्या आईने कधीच नसते केले असे सांगत त्यांनी स्वराज यांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, काँग्रेस खासदारांनी शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या स्मारकाजवळ धरणे आंदोलन केले. 'मोदींनी मौन सोडावे, हुकूमशाही वृत्ती चालणार नाही' अशी घोषणा याप्रसंगी देण्यात आली.