उत्तर प्रदेशातील महोबा येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर काम करणारा एक कर्मचारी चरखारीचे आमदार ब्रजभूषण राजपूत यांना आपलं लग्न लावून देण्याची विनंती करत आहे. आमदार आपल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. कर्मचाऱ्याने आमदारांना पाहताच लगेच त्यांच्या दिशेने धाव घेतली.
"मी तुम्हाला मत दिलं आहे, आता तुम्ही माझं लग्न करून द्या" असं स्पष्टच सांगितलं. यावर आमदारांनी कर्मचाऱ्याला मुलगी शोधून त्याचं लवकरच लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले होते. त्यांना पाहताच एक कर्मचारी आपलं काम सोडून त्यांच्या दिशेने धावला.
आमदारांना वाटलं की, कर्मचारी कोणत्यातरी प्रकरणाची तक्रार करायला पुढे धावत आला आहे. ते कर्मचाऱ्याची तक्रार ऐकून घेतल्यावर हैराण झाले. लग्न होत नसल्याने नाराज असल्याचं कर्मचाऱ्याने सांगितलं. लग्नासाठी आणखी कोणाला सांगितलं आहे काय़ असंही आमदारांनी विचारलं. त्यावर कर्मचाऱ्याने तुमच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या गोस्वामी यांनाही लग्न लावून देण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.
आमदारांनी कर्मचाऱ्याला पगाराबाबत विचारणा केली. त्यांना उत्तर देताना तो म्हणाला की, महिन्याला सहा हजार रुपये पगार आहे. त्याच्याकडे जमीनही आहे. त्यावर आमदार म्हणाले की, तू तर खूपच श्रीमंत आहेस, तुझं लग्न आता आम्ही लावून देऊ. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.