लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात लोकसभेच्या नैतिकता समितीची गुरुवारी पहिली बैठक होणार आहे. त्यात भाजपचे खासदार आणि तक्रारकर्ते निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत डेहडराई यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीत दुबे यांनी डेहडराई यांनी दिलेल्या कागदपत्रांचा हवाला दिला आहे. बिर्ला यांनी हे प्रकरण भाजप खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या समितीकडे पाठवले.
दुबे यांचा पलटवार
खासदार महुआ मोईत्रा आणि त्यांच्यावर आरोप करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात वार-प्रतिवार होत आहेत. ‘प्रश्न संसदेची प्रतिष्ठा, भारताची सुरक्षा आणि कथित खासदाराचे हक्क, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा आहे. देशाची दिशाभूल करून तुमच्या भ्रष्टाचाराबाबत आहे,’ असा पलटवार दुबे यांनी केला आहे.
मोईत्रा यांची टीका
लाचखोरी प्रकरणात दुबे यांच्या पत्रावर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पूर्ण सहकार्य करेल, असे उत्तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिले. यावर महुआ मोईत्रा यांनी अश्विनी वैष्णव बनावट पदवी असलेल्या व्यक्तीला पत्र लिहून तपासाला पाठिंबा देणार असल्याचे सांगत असल्याची टीका केली.