नवी दिल्ली : 'कॅश फॉर क्वेरी' च्या आरोपाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला आहे. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी कबूल केले. यावर आता महुआ मोईत्रा यांनी भाष्य केले आहे.
याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभा पॅनेलसमोर प्रतिज्ञापत्र केल्यानंतर आणि सरकारी साक्षीदार बनल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "सीबीआय, एथिक्स कमिटीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे."
एका स्वाक्षरी केलेल्या प्रतिज्ञापत्रात दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले की, महुआ मोईत्रा यांनी नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी गौतम अदानींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या निष्कलंक प्रतिष्ठेमुळे विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. तसेच, केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचे दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी सोशल बेवसाईट एक्सवर पोस्ट केले आहे. "सीबीआय आणि एथिक्स कमिटीने (ज्यामध्ये भाजपचे पूर्ण बहुमत आहे) जर त्यांनी मला बोलविले तर मी प्रश्नांची उत्तरे देण्याचे स्वागत करते", असे महुआ मोईत्रा यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, "एथिक्स कमिटीचे अध्यक्ष मीडियाशी खुलेपणाने बोलतात. 'प्रतिज्ञापत्र' माध्यमांपर्यंत कसे पोहोचते? अध्यक्षांनी आधी हे कसे फुटले याची चौकशी करावी. मी पुन्हा सांगते, अदानींबद्दल माझे तोंड बंद करण्यासाठी मला लोकसभेतून बाहेर काढणे, हा भाजपचा एक सूत्री अजेंडा आहे," असे महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे.
'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गेल्या रविवारी लोकसभा सभापतींना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. तसेच, यानंतर निशिकांत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभा वेबसाइटवरील लॉगिनचा मुद्दा उपस्थित केला. निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेच्या वेबसाईटच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे.