राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर लोकपालांनी महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये निशिकांत दुबे म्हणाले की, माननीय लोकपाल यांनी आज मी केलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी खासदार महुआ मोईत्रा यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामध्ये निशिकांत दुबे यांनीच महुआ मोईत्रा यांनी संसदीय आयडीचा आपला लॉगइन पासवर्ड शेअर केला होता, असा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्या संसदीय खात्यावर दुबईतून ४७ वेळा लॉग-इन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
महुआ मोईत्रा ह्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर एक आक्रमक खासदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. राजकारणात येण्यापूर्वी त्या बँकर होत्या. दरम्यान, सध्या महुआ मोईत्रा या संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन चर्चेत आहेत.