तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार आणि पश्चिम बंगालमधल कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्यासमोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी लोकपालांनी केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) ला महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. आता सीबीआयकडून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात लवकरच एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय लोकपालांनी सीबीआय़ला सहा महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकपालांनी आपल्या आदेशामध्ये सांगितले की, रेकॉर्डवर असलेल्या संपूर्ण माहितीचं सावधपणे मूल्यांकन आणि विचार केल्यानंतर त्यांच्याविरोधात काही पुरावे दिसत आहेत. तसेच त्यांच्याकडील पद पाहता त्यापैकी काही गंभीर वाटत आहेत. त्यामुळे याबाबत सखोल चौकशीची आवश्यकता आहे, असे वाटते.
लोकपालांनी आपल्या आदेशामध्ये सांगितले की, एका लोकप्रतिनिधीच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. भ्रष्टाचार हा एक असा आजार आहे जो या लोकशाहीवादी देशाच्या विधायक, प्रशासनिक, सामाजिक आणि आर्थिक कार्यप्रणालीवर प्रतिकूल परिणाम करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भ्रष्ट प्रथांना समाप्त करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे.
दरम्यान, सभागृहात प्रश्न विचारण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महुआ मोईत्रा यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा विश्वास दर्शवला असून त्यांना कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.