नवी दिल्ली - नरेंद्र मोदी पुन्हा सरकारमध्ये येणं हे अल्पसंख्याक समाजासाठी धोकादायक आहे अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात होती. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या मनातील काल्पनिक भीती घालवणे हे मुख्य आव्हान आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे. संविधानाची साक्ष ठेऊन संकल्प करा, या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचं काम करा. समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे असा सल्ला नरेंद्र मोदींनी उपस्थित खासदारांना दिला. तसेच घरातील उपासना पद्धती कुठलीही असो, बाहेर पडल्यानंतर भारत देश हीच आपली माता आहे असंही मोदींनी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- 'सत्ताभाव जसजसा कमी होत जाईल, तसतसा सेवाभाव वाढत जाईल आणि जनतेचा विश्वासही दृढ होईल'
- जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही.
- आज ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठीही आणि ज्यांचा विश्वास जिंकायचा आहे त्यांच्यासाठीही आपल्याला काम करायचं आहे. तेव्हाच 'सब का साथ, सब का विकास' हे ब्रीद प्रत्यक्षात येईल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आहे त्याच्या कसोटीत राहून काम केलं तर कोणत्याही संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही.
- लोकसभेत पहिल्यांदा खासदार झालेल्यांनी प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहा
- अनेक प्रस्थापितांना पराभूत करुन तुम्ही आला आहात त्याचा घमंड ठेवू नका, तुम्ही मोदींमुळे निवडून आला नाही तर जनतेच्या आदेशामुळे निवडून आला आहे
- जनतेच्या मतांचे सन्मान करा. जनता आणि स्वत: यामध्ये अंतर ठेऊ नका. अहंकारापासून दूर ठेवा
- दिल्लीत अशी व्यवस्था आहे जी तुम्हाला बर्बाद करेल. तुमचं काम करण्यासाठी तुमच्या मतदारसंघातील योग्य उमेदवाराला संधी द्या
- जुन्या खासदारांनी केलेल्या शिफारशींची माणसं भरु नका. तुमचा विश्वास ज्या माणसांवर आहे त्या माणसाला जबाबदारी द्या
- सरकारमध्ये कोण मंत्री होणार हे मिडीया ठरवणार नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका