पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला पोहोचले होते. येथे पंतप्रधान मोदी भाषण करत असताना गर्दीतील एका मुलीने मोदींचं एक स्केच हातात धरलं होतं. जेव्हा पीएम मोदींची नजर स्केच घेऊन उभ्या असलेल्या मुलीवर पडली तेव्हा ते लगेच म्हणाले, "मुली, मी तुझं हे स्केच पाहिलं आहे. तू खूप छान काम केलं आहेस."
नरेंद्र मोदी यांनी मुलीला सांगितलं की, "मी तुला आशीर्वाद देतो, पण मुली तू थकून जाशील, तू बराच वेळ उभी आहेस. मी या पोलिसांना सांगतो की, मुलीला स्केच द्यायचं असेल तर घ्या, माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. बाळा, त्यावर तुझा पत्ता दे. मी तुला नक्कीच पत्र लिहीन." पंतप्रधानांनी हे सांगताच मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मोदींच्या प्रतिक्रियेनंतर मुलगी खूप आनंदी दिसत होती.
पंतप्रधानांनी लहान मुलीवर दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल लोक त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे. मोदींनी गुरुवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे जनतेला संबोधित केले. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या समर्थनार्थ वादळ वाहत असून त्याची झलक कांकेरमध्येही पाहायला मिळत आहे.
"हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही"
"दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार असताना छत्तीसगड राज्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले, परंतु आम्ही छत्तीसगडच्या विकासासाठी सर्व पावले उचलली. छत्तीसगडच्या भल्यासाठी भाजपा नेहमीच काम करत आहे. काँग्रेसची गेली पाच वर्षे अपयशी ठरली आहेत. काँग्रेसने छत्तीसगडला फक्त गुन्हेगारी दिली. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असे आज संपूर्ण छत्तीसगड सांगत आहे. काँग्रेसचे सरकार बदलावे लागेल."
"जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचार करते, तेव्हा फक्त राज्यच नाही तर प्रत्येक घराचं नुकसान होतं. ती तुमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करते. तुमच्याकडे कोळसा आहे पण तुम्हाला पुरेशी वीज मिळत नाही, काँग्रेसचे लोक तुमच्या कोळशावर कमिशन घेत आहेत. गरिबांचा विचार करणे ही भाजपा सरकारची प्राथमिकता आहे. प्रत्येक गरीब आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा भाजपाचा संकल्प आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.