मैनपुरी-
मैनपुरी पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी दावा केला आहे की भाजपा प्रशासनाकडून सपाच्या स्थानिक नेत्यांना नाहक त्रास दिला जाऊ शकतो. त्यामुळे डिंपल यादव यांनी सपा नेत्यांना सल्ला दिला आहे की मतदानाच्या एक दिवसआधी रात्री आपापल्या घरी झोपू नका. 'सपा'चे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर मैनपुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मैनपुरीसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
डिंपल यादव रविवारी भोगांव येथे निवडणूक प्रचारासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सपा नेते आणि कार्यकर्त्यांना एक सल्ला दिला. "मी माझ्या सपा नेते आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की ४ डिसेंबर रोजी प्रशासन तुमच्यावर कारवाई करेल. त्यामुळे ४ डिसेंबरच्या रात्री तुम्ही तुमच्या घरी झोपू नका. ५ डिसेंबरला मतदान करा आणि ६ डिसेंबरला प्रशासन इथून निघून जाईल. तुम्हाला कुणीही हात लावू शकणार नाही", असं डिंपल यादव म्हणाल्या. यासोबतच डिंपल यांनी महिलांना मतदान करण्याचं आवाहन केलं. प्रशासन महिलांवर जबरदस्ती करू शकत नाही. महिला महाशक्ती आहेत, तुम्ही लढू शकता. त्यामुळे न घाबरता घराबाहेर पडा आणि मतदान करा, असं डिंपल यादव म्हणाल्या.
मैनपूरमध्ये प्रशासनच पोटनिवडणूक लढत आहे असं आपल्याला एका वृद्ध नागरिकानं सांगितल्याचंही डिंपल यादव यावेळी म्हणाल्या. "एका बाजूला प्रशासन निवडणूक लढवत आहे. तर दुसऱ्याबाजूला मैनपुरीचे नागरिक आहे की जे नेताजींसाठी निवडणूक लढवत आहेत. ही माझी निवडणूक नाही ही लोकांची निवडणूक आहे. नेताजींच्या (मुलायम सिंह यादव) सन्मानाची निवडणूक आहे. मला विश्वास आहे की मैनपुरीची जनता नेताजींचा सन्मान राखेल", असं डिंपल यादव म्हणाल्या.