- संजय शर्मा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी परदेश दौऱ्यावरून परतताच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मणिपूरच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यापासून ते राज्यपाल अनसूया उइके यांना बदलणे आणि पुढील महिन्यात जुलैमध्ये सरकार आणि संघटनेत मोठे बदल करण्यावर दीर्घ चर्चा झाली. सूत्रांनी सांगितले की, मणिपूरबाबत लवकरच केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये दिसेल. पुढील महिन्यात केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत अनेक मोठे बदल दिसतील. काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल, नव्या नियुक्त्यांची घोषणाही होऊ शकते.
अमेरिका आणि इजिप्तच्या परदेश दौऱ्यानंतर भारतात पोहोचताच दिल्ली विमानतळावरच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. पक्षातर्फे चालविलेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती घेतली. गृहमंत्री अमित शाह यांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांना मणिपूरमधील स्थितीची व सर्वपक्षीय बैठकीतील सर्व नेत्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेच्या तयारीबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा केली आणि सुरक्षाव्यवस्था वाढविण्यास सांगितले.
लवकरच निवडणुकीचे रणशिंगn पंतप्रधान मोदी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशातील शहडोल आणि भोपाळमध्ये जाऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. n जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजप संघटना आणि सरकारमधील बदलाचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काय बदलणार?- सूत्रांचा दावा आहे की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि भाजप संघटनेत मोठे बदल होऊ शकतात. - पाच राज्यांचे निवडणूक प्रभारी नियुक्त करायचे असून, काही नवे राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त करायचे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेची जबाबदारीही दिली जाईल. - विरोधी महाआघाडीपेक्षा एनडीए परिवार मोठा करण्यासाठी काही मित्रपक्षांनाही सरकारमध्ये सामावून घेतले जाणार आहे. - यात बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार तसेच अकाली दलाशी संभाव्य युती पाहता, हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचा समावेश आहे.