नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना विरोधकांची जीभ घसरत असल्याचे हल्ली वारंवार पाहायला मिळत आहे. या यादीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांचीही भर पडली आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले होते. पण आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ना घर का ना घाट का,धोबी का कुत्ता अशी होईल. एकूणच शेवटी ते ना इकडचे राहतील नाही तिकडचे. '', असे वादग्रस्त विधान मेमन यांनी पंतप्रधानांवर टीका करताना केले आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी इंदूरमध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शांततामय सहजीवनाचा संदेश याच समाजाने जगभर नेला आहे, असे समाजाचे कौतुक मोदींनी केले होते. यावरुन मेमन यांनी मोदींवर निशाणा साधला.
(पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी, संजय निरुपम यांची जीभ घसरली)
यापूर्वी भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचीही जीभ घसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'चलो जीते है' लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला होता. यावेळेस ते असंही म्हणाले की, ''मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत. मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुलं काय शिकणार आहेत?. पंतप्रधानांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही''. असेही ते म्हणाले होते.