कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथे पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोलकातामधील तारताला परिसरातील माजरहाट पूल कोसळला असून, या दुर्घटनेमुळे काही गाड्या आणि अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा पूल सुमारे 60 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत असून, बेहाला आणि इक्बालपूर या परिसरांना हा पूल जोडत होता. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मदत आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली काही माणसं अडकल्याची शक्यता विचारात घेऊन मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच अपघातस्थळापासून जवळच लष्कराची छावणी असून, तेथूनही मदत मागवण्यात आली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेत पुलाखाली आठ ते दहा जण दबल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मंत्री फरहाद हकीम यांनी दिली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सध्यातरी सरकारचे सर्व लक्ष मदत आणि बचाव कार्यावर असेल, असेही बॅनर्जी यांनी सांगितले आहेत. दरम्यान या दुर्घटनेवरून राजकारणही सुरू झाले असून, भाजपाने या दुर्घटनेसाठी ममता सरकारला जबाबदार धरले आहे.