अमरावती:आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. गोदावरी जिल्ह्यातील जांगरेड्डीगुडेम येथे, तोल गेल्याने बस नदीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. अपघातातील किरकोळ जखमींना जांगारेड्डीगुडेम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तर गंभीर जखमी प्रवाशाला एलुरु येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये 45 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, बस तेलंगणातील अस्वरपेट येथून जांगारेड्डीगुडेमला जात होती. जालेरू नदीवरील पुलावर विरुद्ध दिशेने येणारी एक लॉरी टाळण्यासाठी बस चालकाने मार्ग वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.
सरकारने भरपाई जाहीर केली
दरम्यान, राज्य सरकारने या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे परिवहन मंत्री पी वेंकटरामय्या यांनी सांगितले. राज्यपाल बी.बी. हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एस शैलजानाथ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस एस विष्णुवर्धन रेड्डी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.