कानपूर:उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीतून 50 जणांना घेऊन जाणारी एक बोट बुडाली. मारका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस गोताखोरांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि इतरांचा शोध सुरू केला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, यमुना नदीतून 50 जणांना घेऊन एक बोट जात होती, यादरम्यान हथनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बोट नदीन बुडाली. प्रवाह जास्त असल्यामुळे पाणबुड्यांनाही लोकांना वाचवण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, त्यांनी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, इतर 46 जणांचा शोध सुरू आहे.
या बोटीतील काही लोक रक्षाबंधन सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही जात होते. रक्षाबंधन सणावर झालेल्या अपघातामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. असेच एक प्रकरण बनारसमध्ये तीन महिन्यांपूर्वी समोर आले होते. गंगा नदीत एक बोट बुडून तिघांचा मृत्यू झाला होता.