बिहारच्या लखीसरायमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामगडचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिहारौरा गावात घडली. ही घटना आज रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान घडली. अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने ऑटोचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला.
15 जण ऑटोमधून जात असताना अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जण जखमी झाले. मृतांमध्ये 8 लोक मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत. हे सर्व लोक केटरिंगचे काम करायचे, जे काम करून सिकंदराहून लखीसरायला येत होते.
मृतांमध्ये ऑटोचालक मनोज कुमार, दिवाना कुमार, छोटू कुमार, रामू कुमार, अमित कुमार यांच्यासह 9 जणांचा समावेश आहे. ऑटोचालक मनोज हा जिल्ह्यातील महिसोना गावचा होता. 5 जखमींना उपचारासाठी पाटणा PMCH मध्ये रेफर करण्यात आले आहे. आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.