हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सर्वत्र उत्साहात दसरा साजरा होत असताना मोठी दुर्घटना घडली. बऱ्याच ठिकाणी रावण दहन केलं जातं पण याच दरम्यान भयंकर प्रकार घडला. रावण दहनात रावणाचा पेटता पुतळा गर्दीवर पडला. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. थरकाप उडवणारे याचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या यमुनानगरमधील ही धक्कादायक घटना आहे. रावणाच्या मोठ्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पुतळा जसा जाळला तसा तो खाली कोसळला. तिथेच खाली लोक रावण दहन केल्याचा आनंद व्यक्त करत होते. सर्वजण उत्साहात होते. या गर्दीवरच हा पेटता रावण पडला आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एएनआयने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अचानक रावणाचा पेटलेला पुतळा हा उपस्थित असलेल्या लोकांवर पडला.
या दुर्घटनेत नेमकं किती जण जखमी झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पुतळा जमिनीवर पडल्यानंतर फटाके फुटत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच आणखी एका ठिकाणी रावण दहनाआधीच पुतळा खाली पडला. पुतळा क्रेनने उचलत असताना मध्येच तुटला आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने पुतळा पुन्हा उभा करण्यात आला आणि तो जाळण्यात आला.
उत्तर प्रदेशच्या लखनऊ, कानपूरसह बऱ्याच ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा खराब झाला. तर काही ठिकाणी जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे पुतळा खाली पडला. पुतळा पावसात भिजल्यामुळे तो पेटलाच नाही. त्यामुळे तो पेटवण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"