पश्चिम बंगालच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार, हत्या प्रकरणात कॉलेजचे तत्कालीन प्रिंसिपल संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले आहे.
एएनआयने याचे वृत्त दिले आहे. आयएमए मुख्यालयातून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर व्ही अशोकन यांनी एक समिती स्थापन केली होती. आईएमए कोलकाता शाखेचे घोष हे उपाध्यक्ष होते. त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
सीबीआयने घोष यांची पॉलिग्राफ टेस्ट घेतली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली होती. बंददरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. अनेक नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
भाटपारा येथे भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या गाडीवर गोळीबार झाला. टीएमसीच्या सुमारे 50-60 लोकांनी हल्ला केला. वाहनावर 6-7 राउंड फायर करण्यात आले आणि बॉम्ब फेकण्यात आले. चालकासह दोघांना गोळ्या लागल्या आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल छात्र परिषदेच्या 27 व्या स्थापना दिन कार्यक्रमात भाजपवर एआयचा वापर करून आपली बदनामी केल्याचा आरोप केला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) सारख्या नवीन कायद्यांमध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर तरतुदी नाहीत. आम्ही पुढील आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवू आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १० दिवसांत विधेयक मंजूर करू. आम्ही हे विधेयक राज्यपालांकडे पाठवू. त्यांनी विधेयक मंजूर न केल्यास आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करू, असे ममता यांनी स्पष्ट केले.