नवी दिल्ली: सुदानमधील राजधानी खर्तूमच्या बहारी भागात सिलोमिक फॅक्टरी सलोमीमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट झाला असून यामध्ये 18 भारतीयांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
सुदानमधील दूतावासाने दिलेल्या माहितीनूसार मंगळवारी एलपीजी सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 23 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 18 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच 130 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपरचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
दूतावासांकडून काही नागरिकांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या नावांसोबतच बेपत्ता लोकांची देखील नावे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काहीजण गंभीर जखमी झाल्याने ओळख पटविणे कठीण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.